वारीच्या वाटेवर
गेली दोन वर्षे कोरोनाच्या छायेत गेल्यावर यावर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये वारक-यांची मांदियाळी पहायला मिळतेय. वारी पूर्ववत पार पडल्याचा आनंद आहेच पण या २०/२१ दिवसांत एकदाही वारीत सहभागी होता आलं नाही याचं वाईट वाटतयं..
लहानपणापासूनच मी वारी अगदी जवळून अनुभवत आलेय. वाल्ह्यात माऊलींच्या पालखीला नगरप्रदक्षिणा व्हायची तेव्हा तो सोहळा आमच्या दुकानात बसून मी अनेकदा अनुभवलाय. नंतर दोन किलोमीटरचा रस्ता चालत जायचं आणि भेंडीबाजारच्या मैदानावर जाऊन पालखीचं दर्शन घ्यायचं. संध्याकाळी मम्मीच्या आजोळच्या दिंडीत जेवण करुन परत यायचं हा शिरस्ता होता. पुण्यात शिक्षणासाठी आल्यावर तुकारामांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरात जायचो..
रिपोर्टर म्हणूनही जवळपास सात वर्षे वेगवेगळ्या टप्प्यांवर वारी कव्हर केली. सलग दोन वर्षे वारीचं आळंदी ते पंढरपूर असं कव्हरेज केलं. एकूणच काय तर अगदी काही वर्षांचा अपवाद वगळता हा आयुष्यातल्या प्रत्येक वर्षी हा सोहळा अनुभवला... त्यामुळे वारीसाठी मनातला एक स्पेशल कप्पा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही..
झी चोवीस तास मध्ये जॉईन झाल्यानंतर जवळपास चार वर्षांनी वारी कव्हर करण्याची संधी मला मिळाली. पहिल्यावर्षी तुकोबांच्या पालखीमार्गावर रिपोर्टिंग केलं तर दुसर्या वर्षी माऊली आणि तुकोबा दोन्ही पालख्या एका वेळी कव्हर करण्याचं आव्हान होतं.. दोन्ही वेळी वारीने आयुष्यभर पुरेल इतकी आठवणींची शिदोरी दिलीये.. त्यातली एक आठवण आज शेअर करत आहे
२०१७ मध्ये मी तुकोबांची पालखी कव्हर केली. या पालखी मार्गाची माहिती सहकारी, मित्र-मैत्रिणी यांच्याकडून घेतलेली. वेळापत्रक तोंडपाठ केलेलं. मात्र थिअरी आणि प्रॅक्टिकल मध्ये फरक असतोच ना ! अगदी तसाच काहीसा अनुभव आला. पंढरपूर मध्ये राहण्यासाठी हॉटेल बुक करायला मला थोडा उशीर झाला. त्यात पालखी मार्गावर अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकीच चांगली हॉटेल्स आहेत. अकलूज नंतर थेट पंढरपूरलाच राहण्यासाठी चांगली सोय आहे त्यामुळे अनेक रिपोर्टर पालख्या पंढरपूरला पोहचायच्या एक - दोन दिवस आधीच पंढरपूर गाठतात. पण बुकींग नसल्यामुळं आम्हाला अकलूजचा मुक्काम एक दिवस वाढवावा लागला. दुसर्या दिवशी दुपारी वाखरीवर तुकारामांच्या पालखीचं गोल रिंगण कव्हर करायचं होतं. तर तिथेच बाजीरावची विहीरला माऊलींच्या पालखीच गोल रिंगण पार पडतं. ते रिंगण पहायला वारीतल्या सर्वच वारक-यांची गर्दी उसळते.. शेवटच्या दोन दिवसांत सर्वच पालख्या एका मार्गावर आलेल्या असतात.. वातावरण अगदी विठूमय झालेलं असतं... प्रत्येक वारकरी पंढरपूर जवळ आल्याच्या आनंदात असतो पण टिव्ही रिपोर्टर साठी इथे वेगळी कसोटी असते. इथला प्रचंड जनसमुदाय, नेटवर्क प्रॉब्लेम, ट्रॅफिक जॅम , वेळेची मर्यादा या सगळ्यात रिपोर्टिंग करणं खूप अवघड असतं.. पहिल्या वर्षी मला रस्त्यांविष़यी फार माहिती नव्हती. उशीर होऊन ट्रॅफिक मध्ये अडकायला नको म्हणून अकलूजवरून आम्ही पहाटेच पंढरपूरकडे निघालो.. रस्त्यात एका ठिकाणी नाष्टा करुन साधारण १० च्या दरम्यान वाखरीला पोहोचलो. एखादी स्टोरी करुन, रिंगण कव्हर करुन पुढे पंढरपूरला जायचं असा दिनक्रम ठरलेला होता..पण वारीच्या पंधरा दिवसांच्या प्रवासानंतर त्यादिवशी थोडी कणकण जाणवायला लागली.. दुपारपर्यंत चांगलाच ताप भरला. टीममधील इतर सहका-यांनाही थोडा फार त्रास होत होता.. जवळ असणा-या गोळ्या खाऊन आम्ही गाडीतच आराम करायचं ठरवलं. तापामुळे भूक तर नव्हतीच पण उकाड्यातही थंडी वाजत होती. थोडा आराम करुन रिंगण कव्हर करण्यासाठी एका दिंडीच्या टँकरवर ट्रायपॉड लावला आणि रिंगण सुरु होण्याची वाट पाहत टँकरच्या केबिन मध्ये बसलो तेव्हा कळालं की रिंगण चार वाजता होणार आहे.. त्याबरोबरच भुकेची जाणीव व्हायला लागलेली. पण १ -१.३० किलोमीटर लांब लावलेल्या गाडीकडे जाण्या-येण्यात वेळ जाणार होता आणि तितकी शक्तीही नव्हती.. तो पर्यंत आजुबाजूच्या दिंड्याची दुपारची जेवणं, विश्रांती होऊन आवराआवरी सुरु झाली होती.. ज्या दिंडीत आम्ही होतो त्यांच्याशी माझ्या गप्पा सुरु झाल्या.. महिला रिपोर्टर दिसली की वारीतल्या या महिला वारक-यांना भारी कौतुक वाटतं. अगदी नोकरी पासून ते संसाराच्या गप्पा करुन मग पुढच्या वर्षी जोडीनं वारी करा असाही आग्रह होतो..माझ्या बोलण्यातून त्यांना जेव्हा कळालं की आम्ही सकाळपासून इथे आहोत तेव्हा आपसूकच जेवणाविषयी आग्रह झाला. ' बरं नाही त्यामुळे काहीच नको' असं न सांगता जेवण झालं असं सांगून मी वेळ मारली.. थोड्यावेळाने एका मध्यमवयीन काकूंनी मासवड्याचंं ताट पुढे आणून ठेवलं. "अजून दोन दिवस या वारीत आहात त्यामुळे तब्बेतपाणी सांभाळा "असं सांगत आग्रहाने खायलाही घातलं. बरं नसताना आपण खाण्याचे नखरे करतो तेव्हा घरातले जसं 'गपगुमान जेव' असा दम देतात अगदी तस्साच फील मला आला.. पण मी न सांगता , त्यांना मला बरं नसल्याचं कसं कळालं हे मला अजूनही पडलेलं एक कोडंच आहे.. रिंगण पार पडलं, दिंड्याची देखील पांगापाग झाली. आम्हीही पंढरपूर गाठलं. पण ही आठवण अजुनही मनात आहे. वारीच्या वाटेवर असे अनेक वारकरी भेटतात, जे परत भेटत नाहीत, कधी भेटतील की नाही ही शाश्वती नाही. त्यांचा आपलेपणा मात्र वर्षेनुवर्षे ओळख असल्यासारखा असतो. माझा मामा नेहमी आळंदीला गेल्यावर म्हणायचा 'इथे सगळेच आपलेच वाटतात' . कदाचीत या साधेपणामुळे आणि आपलेपणामुळेच तीन आठवडे घरापासून लांब राहूनही वारीमध्ये कधीच एकटं वाटलं नाही. आणि दरवर्षी वारीत जायची ओढ लागते.
एरव्ही आऊटडोअर शूटच्या वेळी, कामाच्या अनियमित वेळांमुळे टिव्ही रिपोर्टरचा उपवास ठरलेला असतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मिडीयातले सगळेच रिपोर्टर कॅमेरामन याला सरावलेले आहेत. पण वारी याला अपवाद आहे याची जाणीव मला त्या दिवशी झाली. काही झालं तरी विठोबा आहे आमची काळजी घ्यायला हे सांगणा-या बाया- बापड्या मला वारीत पावलो पावली भेटल्या पण त्याचा अनुभव मात्र त्या दिवशी आला आणि तुकाराम महाराजांच्या ओळी आठवल्या
मागे पुढे उभा राही संभाळीत |
आलीया आघात निवाराया |
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा