आईच्या नोकरीची वर्षपूर्ती...
दहा दिवसांच्या सुटीनंतर आठवड्याची सुरुवात झाली ती मिटींग्ज, निकालाच्या बातम्यांचे प्लँनिंग, आठवड्याच्या बातम्या या विषयाने..शिवाय भल्या मोठ्या सुट्टीनंतर मी 'मंडे ब्लू' मध्येच होते ..दिवस सरता सरता आठवलं अरेच्चा 'सकाळ' मध्ये कामाला सुरुवात करून वर्ष लोटलं सुध्दा.. ३ जून २०२३ नेमकी वटपौर्णिमा होती. निगडीच्या मॉडर्न हायस्कूलमधला पहिला दिवसही वटपौर्णिमेचाच..मी कधी फार वटपौर्णिमेची पूजा केली नसली तरी काहीतरी कनेक्शन आहे असं मला सतत वाटतं..तसं आजही वाटून गेलं.
झी २४ तास सोडल्यानंतर मी थेट सई दीड वर्षांची झाल्यानंतर जॉब करण्याचा निर्णय घेतला.. गेल्या वर्षी मे मध्ये 'सकाळ' मधून मुलाखतीसाठी फोन आला. मुलाखत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होता होता समजलं की लगेचच जॉईन व्हावं लागणार. आनंदाने आणि काळजीने पोटात गोळा आला..लगेच जॉईनिंग म्हणजे आता सई आपल्याजवळ दिवसभर नसणार , दिवसभर डे केअरला राहिल का ? माझ्याशिवाय झोपेल का? जास्त वेळ मी दिसले नाही तर रडेल का ?? एक ना अनेक प्रश्न.. एकीकडे करिअर पुन्हा सुरू होतयं हे समाधान दुसरीकडे सईला वेळ देता येईल का याचं गिल्ट...करिअरच्या सुरुवातीला फ्रेशर असूनही कोणतंही टेन्शन न घेता बिनधास्त मुंबईला शिफ्ट झालेली मी आता अनुभव असूनही भलतीच नर्व्हस होते. पहिलाच दिवस हॉरिबल होता. सकाळी दहा वाजता आवरून रेडी असताना कामवाल्या मावशींचा पत्ता नव्हता...शंभरवेळा वेळेत यायला बजावूनही मँडम उशीरा उगवल्या..पुढे डॉक्टरकडून फिटनेस सर्टिफिकेट घ्यायचं होतं तर त्यांनाही इमर्जंसी केस आलेली, सईला डे केअरला सोडायचं होतं.. सगळ्या वेळेचं गणित फिस्कटलं. शेवटी मामाला फोन करून सईला डे केअरला सोडतोस का विचारलं..तो आला आणि सई हसत हसत मला बाय करून गेली (पहिल्या दिवशी मला शाळेत सोडायलाही तोच आलेला)...इमोशनल व्हायलाही वेळ नव्हता.. १ वाजता एचआरच्या ऑफिसमध्ये पोहचून सगळे सोपस्कार पार पाडले.. त्यानंतर इंडक्शन, जॉईनिंग प्रोसेस,सर्वांच्या भेटीगाठी करून घरी आले.. दिवसभर माझ्याशिवाय न झोपलेलं पिल्लू मी घरी आल्यावर दहाच मिनिटांत मला बिलगून झोपी गेलं. पहिलाच दिवस असा तर पुढे काय होईल या विचाराने झोपही लागली नाही रात्रभर...
पाहता पाहता वर्ष झालं सुध्दा पण यातील प्रत्येक दिवस शिकविणारा होता.. वर्किंग मदरची कसोटी पाहणारा होता.. त्यातले नोव्हेंबर, डिसेंबर , जानेवारी हे महिने आमच्यासाठी रोलर कोस्टर राइड होेते.. आमच्या दोघांच्या ऑफिसचे इवेंट, सईचं आजारपण, नीरजच्या हॉस्पिटलच्या फेऱ्या, त्यानंतर माझं आजारपण, पुन्हा सईला झालेलं इन्फेक्शन, तिच्या ब्लड टेस्ट हे सगळं मानसिकरित्या खूप थकवणारं होतं..पण त्यात एकदाही सईने मी ऑफिसला निघाल्यावर रडून गोंधळ घातला नाही की नको जाऊ असं म्हणाली नाही..आपली आई ऑफिसला जाते हे अगदी सहज स्विकारलं तिने..
एवढचं नाही तर आजारपणातून बरी झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसांच्या प्रँक्टिसवर शाळेच्या गँदरिंगमध्ये कम्माल डान्स परफॉर्मन्स दिला.
या काळात आणि एकूणच वर्षभरात 'सकाळ' मधल्या सर्वच वरिष्ठांचा ,सहकाऱ्यांचा सपोर्ट मिळाला.. तर घरून मामा मामी, नीरजचे काका काकी यांचा भक्कम आधार होता आणि आहे.. सईच्या काका, काकी व मावश्यांनी आमच्या परस्पर तीला इतकं जपलं की आता ती आमच्या दोघांपेक्षा त्यांनी सांगितलेली गोष्ट शहाण्या बाळासारखी ऐकते.. कधी काळी आई शिवाय दिवसाही न झोपणारं पिल्लू आता या सगळ्यांकडे उन्हाळ्याच्या सुटीला रहायला जाऊन धमाल करून आलं आहे. 'it takes a village to raise a child.' असं म्हटलं जातं पण करिअर ओरिएंटेड आईसाठी देखील ही म्हण थोड्या फार प्रमाणात लागू पडते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही..
पत्रकारितेमध्ये जरी अनेक वर्षे काम केलं असलं तरी प्रिंटसाठी पिंपरी चिंचवडमध्ये काम करण्याचा माझा हा पहिलाच अनुभव. ज्या शहरात लहानाचे मोठे झालो त्या शहराचे प्रश्न, येथील विविध क्षेत्रातील समस्या मांडण्याचे व ते सोडविण्यासाठी कार्यरत राहण्याचे समाधान काही वेगळेच आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा