स्तनपानाविषयी बोलू काही

 गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दुस-यांदा लॉकडाऊन लागला.  त्याचवेळी आमच्या घरात कोरोनाचे पेशंट असल्यानं आम्ही सगळेच क्वारंटाईन होतो.  नीतिक्षा तेव्हा साधारणत: साडेपाच महिन्यांची होती.  लॉकडाऊनमुळे ब-याचशा नातेवाईकांनी नीतिक्षाला व्हिडीओ कॉलवरच पाहिलेलं.  तिच्याशी गप्पाही तिथेच व्हायच्या. एकदा माझ्या आजोबांशी व्हिडीओ कॉल सुरु असताना ते अचानक मला म्हणाले,  ' पहिले सहा महिने बाळाला आईचंच दुध द्यायचं असतं, तू तो टप्पा गाठलास.   त्याबद्दल तुझं अभिनंदन ! ' त्यांची ही शाबासकी ऐकून मला भरुन आलं. कारण माझ्या आजुबाजूला असणा-या कोणत्याही व्यक्तीने याबाबतीत माझं कौतुक केलं नव्हतं. पण, नको असलेले सल्ले मात्र पावलोपावली मिळत होते.  माझे आजोबा ग्रामविकास अधिकारी होते, फक्त मॅट्रिक पास आजोबांना कदाचित त्यांच्या पेशामुळे स्तनपान किंवा ब्रेस्टफिडींग बद्दल माहिती होती, आहे.  पण स्वतःला उच्चशिक्षित म्हणवणाऱ्या आणि  सतत इंटरनेट हाताशी असणा-या त्यांच्या पुढच्या पिढीच्या मात्र याबाबतीत अनेक गैरसमजूती आहेत. यामुळेच स्तनपान या विषयावर जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि मातांना स्तनपानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा 'जागतिक स्तनपान आठवडा ' म्हणून १७० देशांमध्ये साजरा केला जातो .

आता हा असा आठवडा साजरा करण्याची गरज का पडावी इतका स्तनपान हा विषय दुर्लक्षित आहे का ? आता पर्यंतच्या आया आपल्या पोरांना पाजतच होत्या की !  हे काय नवीन फँड आहे ?  असा प्रश्न सर्वांना पडेल. पण केवळ दुर्लक्षितच नाही तर अगदी बाराखडी पासून शिकवायला सुरुवात करता येईल इतकं अज्ञान याविषयी समाजात  पसरलेलं आहे.  चारचौघात बोलणं तर सोडाच पण ब्रेस्टफिडींग विषयी बाळंतीणीशीही अगदी दबक्या आवाजात चर्चा होते अथवा होतचं नाही. त्यातूनही नवीन आईला अनेक अनाहूत सल्ले मिळतात. ज्याला scientific base अजिबातच नसतो.  

   जसं की,  चार महिन्यांनंतर पाणी द्यायला सुरुवात कर.  जितक्या लवकर वरचं खायला देऊ तितक्या लवकर मुलं दूध सोडतात. खूप दिवस अंगावर पाजलं तर मुलांचे दात खराब होतात. बाळ वर्षाचं झालं की अंगावर पाजणं थांबव नाहीतर नंतर त्रास देतात. कांदा,  बटाटा,  कडधान्य खाऊ नकोस बाळाला गँसेस होतात. तुझं दुध बाळाला पुरतयं ना ? नाहीतर सरळ गायीचं दूध सुरु कर . बाळंतीणीने खूप पाणी पिऊ नये. ही यादी न संपणारी आहे. 

हे सगळे सल्ले देताना खरचं त्या नव्या आईला या सल्ल्यांची गरज आहे का?  ते ऐकण्याची तिची मनस्थिती आहे का? तिला स्तनपान करताना काही त्रास होतोय का? याचा अजिबातच विचार केला जात नाही. पण या चुकीच्या सल्ल्यांमुळेच आईला स्तनपानासाठी प्रोत्साहन मिळत नाही.  याचाच परिणाम म्हणून सध्याच्या काळातही जन्माला  आलेल्या शिशुंपैकी फक्त  ५० टक्के बाळांना ६ महिन्यांनंतर स्तनपान केलं जातं.  एक वर्षांनंतर स्तनपान करणा-या मातांची संख्या तर त्याहूनही कमी असल्याचं आकडेवारी सांगते.  म्हणूनच जागतिक स्तनपान आठवड्यानिमित्त यासारख्या  विषयांवर मोकळेपणानं चर्चा  होणं गरजेचं आहे. 

 Lactation consultant ,म्हणजेच स्तनपान सल्लागार किंवा तज्ञांच्या सांगण्यानुसार ' पहिले सहा महिने बाळाला फक्त आणि फक्त आईचंच दुध दिलं पाहिजे.' हा बाळाला स्तनपान करणं हा आईचा हक्क आणि अत्यंत वैयक्तिक बाब आहे. अर्थात ते करायचं की नाही याचं स्वातंत्र्य प्रत्येकीला आहेच. पण इच्छा असुनही केवळ आजुबाजूच्या लोकांच्या सांगण्यावरुन, त्यांच्या दबावाला बळी पडून,  पुरेशी माहिती न घेता, किंवा  दुध कमी येत म्हणून अनेकजणी सहा महिन्यांच्या आतच  बाळाला वरचं दुध, पाणी किंवा अन्न द्यायला सुरुवात करतात.  प्रेग्नन्सी मध्ये लहान- सहान गोष्टींसाठी डॉक्टरकडे धाव घेणा-या आई- वडिल, आजी - आजोबांना स्तनपानासारख्या महत्वाच्या विषयावर वैद्यकीय सल्ला घ्यावा असं वाटत नाही, हा आपल्या समाजातला विरोधाभास आहे.

 स्तनपान करण्याविषयी जशी अनेक मतमतांतरे आहेत तशीच ती  थांबविण्यासाठीही आहेत.  अनेकदा बाळ वर्षाचं झालं की ' ' पाजणं थांबव आता नाहीतर चारचौघात बाळ त्रास देईल ' असा सल्ला हमखास मिळतो. आणि बाहेर पडल्यावर त्रास नको म्हणून आईही तसचं करते.  पण यावेळी नाण्याची दुसरी बाजूही पाहणं गरजेचं आहे.  सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्यासाठी सोय नसणं हेही त्यातलं मुख्य  कारण आहे. जिथे एका बाजूला आईचं दुध कसं अमृत आहे वैगेरे जाहिरात केली जाते,  तिथे स्तनदा मातांना सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवासात स्तनपान करता यावं यासाठी कसलीही सोय केलेली दिसत नाही. तीच अवस्था कित्येक खाजगी मॉल आणि हॉटेल्स आणि ऑफिसेस मध्येही आहे. ब-याचशा नोकरदार महिला डिलीव्हरीनंतर सहा महिने मँटिर्निटी लिव्ह घेऊन लगेच कामावर रुजू होतात . पण कामावर असताना ब्रेस्टमिल्क एक्स्प्रेस करण्यासाठी आवश्यक स्पेस महिलांना मिळत नाही.  त्यामुळे नाईलाजास्तव स्तनपान बंद करावं लागतं. वेळेत ब्रेस्टमिल्क एक्सप्रेस करता न आल्याने दुधाच्या गाठी झाल्याच्या तक्रारी देखील मी अनेक मैत्रिणीकडून ऐकल्या आहेत. त्यामुळे स्तनपान हा विषय फक्त जाहिराती आणि ब्रीदवाक्यांपुरताच मर्यादित आहे का असाही प्रश्न पडतो. 

आईचं दूध बाळासाठी पोषक आहे,  कमीत कमी दोन वर्षे तरी स्तनपान केलं पाहिजे, त्याने बाळ  सुदृढ होतं कॅन्सरचा धोका टळतो  वैगेरे गोष्टी आता सर्वश्रुत आहेत.  पण खरच जर पुढच्या पिढीला निरोगी  आयुष्य द्यायचं असेल तर स्तनपानासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध असणं आवश्यक आहे. यानिमित्तानं महिलांनी पुढे येऊन या मागण्या लावून धरणंही गरजेचं आहे.  नाहीतर 'ब्रेस्टफिडींग वीक' काय किंवा 'ब्रेस्ट फिडींग डे' काय  इतर डेज प्रमाणे केवळ शुभेच्छा देण्या-घेण्या पुरतेच मर्यादित राहतील. 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आईच्या नोकरीची वर्षपूर्ती...

अध्याय पहिला !